कोकोचा पुरवठा घटल्याने चॉकलेटच्या किमतीत वाढ

लंडन – ऐन व्हॅलेंटाइन दिनाच्या पूर्वसंध्येला चॉकलेटचा गोडवा घटण्याच्या बेतात आहे. चॉकलेट बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या कोकोचा पुरवठा यंदा घटल्याने चॉकलेटचे भाव वाढणार आहेत. चॉकलेट बनवण्यासाठी कोको हा पदार्थ आवश्यक असतो. त्याच्या बियांचे उत्पादन प्रामुख्याने आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील देशांमध्ये होते. तेथील घाना, आयव्हरी कोस्ट आदी देश जागतिक स्तरावर कोकोच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र, यंदा अल-निनो परिणामामुळे हवामानात झालेले बदल कोकोच्या उत्पादनाला मारक ठरले आहेत.
बाजारातील आवक घटल्याने कोकोचे दर गेल्या वर्षभरात दुप्पट झाले आहेत. काल न्यूयॉर्कच्या वायदेबाजारात एक टन कोकोचा दर आजवरच्या उच्चांकावर, म्हणजे ५,८७४ डॉलर्सवर गेला होता. कोकोबरोबरच साखरेचेही भाव वाढल्याने ब्रिटनमध्ये डिसेंबर महिन्यात काही चॉकलेटच्या दरात ५० टक्के वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील अन्नधान्य महागाईचा दर ८.३ टक्के होता. त्यामुळे चॉकलेटच्या दरात १५.३ टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी ग्राहकांनी चॉकलेटकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.
भारतात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत कोको आणि रबराचे उत्पादन होते. गेल्या काही महिन्यांत रबराचे दर घटू लागल्याने उत्पादक अडचणीत आले होते. पण आता जागतिक बाजारात कोकोचे दर वाढू लागल्याने दक्षिण भारतातील रबर उत्पादक कोको लागवडीकडे वळले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top