‘कोयने ‘तून पाणी सोडल्याने अखेर कृष्णाकाठच्या शेतकर्‍यांना दिलासा

कराड- कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने कोयना धरणातून काल दुपारपासून २६०० क्युसेकने पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. कोयनेतून विसर्ग वाढविल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पिण्यासह शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कृष्णा नदीत सध्या पाणी कमी असून पाण्यास दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाऊस नसल्यामुळे दुष्काळी जत,आटपाडी, कवठेमहांकाळ,खानापूर, तासगाव,मिरज,कडेगाव तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे रबी पिकांसह द्राक्ष बागाही वाळण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून पाणीपुरवठा चालू आहे. यामुळे कृष्णा नदीत पुरेसा पाणीसाठा नाही.

सांगली, भिलवडीसह अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती.आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर व अमोल बाबर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२ वाजता कोयना धरणाचे स्लुइस गेट उघडून ५०० क्युसेक आणि कोयना धरण पायथा विद्युत गृहाची दोन्ही युनिट सुरू करून त्याद्वारे २,१०० असे दोन हजार ६०० क्युसेकने धरणातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरण व्यवस्थापनच्या या निर्णयामुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांसह पाणीपुरवठा योजना असणाऱ्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top