कोर्टात नेण्यास पोलिसांची टाळाटाळ! एल्गार परिषद आरोपींचे तुरुंगात उपोषण

मुंबई – न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असताना शुक्रवारी ठरलेल्या दिवशी पोलिसांनी न्यायालयात हजर न केल्याने निषेध म्हणून एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या ७ आरोपींनी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले.

कबीर कला मंचचे कार्यकर्ता सुरेंद्र गडलिंग, सागर गोरखे यांच्यासह हनी बाबू, रोना विल्सन आणि महेश राऊत या ७ जणांवर एल्गार परिषद आयोजित करून राष्ट्रद्रोही कारवाया केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. हे ७ आरोपी तळोजा कारागृहात आहेत.

गडलिंग यांना १४ फेब्रुवारी २०२० रोजी अटक करण्यात आली आहे, तेव्हापासून ते तळोजा कारागृहात आहेत. अपुऱ्या पोलीस संरक्षणाचे कारण देत तळोजा कारागृह प्रशासन त्यांना न्यायालयात हजर करण्यास सातत्याने टाळाटाळ करीत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी गडलिंग यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी गडलिंग यांनी पोलिसांच्या टाळाटाळीबद्दल तक्रार केली. त्यावर न्यायालयाने या ७ आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश तळोजा कारागृह प्रशासनाला दिले होते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी पुरेसे पोलीस संरक्षण देण्यास असमर्थता दर्शविल्याचे कारण देत प्रशामनाने आरोपींना न्यायालयात हजर केले नाही. त्याचा निषेध म्हणून आरोपींनी आमरण उपोषण सुरू केले आहे.