क्युबामध्ये गंभीर वीजसंकट संपूर्ण देशात ब्लॅकआऊट

हवाना – कॅरिबियन द्विपसमूहातील क्युबा या देशाला सध्या गंभीर वीजसंकटाचा सामना करावा लागत आहे.इलेक्ट्रिक ग्रिड बंद झाल्यामुळे देशातील प्रमुख वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेला अँटोनियो गुटेरस वीज निर्मिती प्रकल्प ठप्प झाला. त्यामुळे संपूर्ण देश सर्वात मोठे ब्लॅकआऊट झाले.विजेचा तुटवडा असल्याने सरकारने वीजवापरासाठी कठोर नियम केले आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत आवश्यक कामे करणाऱ्या कामगारांनीच घराबाहेर पडावे, अशी सूचना सरकारने दिली आहे.संपूर्ण आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात आल्या. तसेच नाईट क्लब आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या केंद्रांवर बंदी घातली आहे.क्युबामध्ये मागील कित्येक दिवसांपासून विजेचा तुटवडा आहे.लाखो लोक गेले काही दिवस विजेशिवाय रहात आहेत. क्युबाचे पंतप्रधान मॅन्युअल मार्रेरा क्रुझ यांनी या वीजसंकटाला अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध जबाबदार आहेत,असा आरोप केला आहे.