नवी दिल्ली – भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेवर पाठविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या चार अंतराळवीरांची नावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत स्वदेशी बनावटीच्या यानातून पहिल्यांदाच अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे.
ग्रूप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रूप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रूप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर सुधांशू शुक्ला या चार अंतराळवीरांची गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे.तिरुवअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. या भेटीत मोदी यांनी गगनयानसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली. याप्रसंगी इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ उपस्थित होते. याप्रसंगी निवड प्रक्रियेत सामिल करण्यात आलेल्या सर्व अंतराळवीरांची मोदी यांनी भेट घेतली.त्यानंतर निवड करण्यात आलेल्या चार अंतराळवीरांना विंग्ज हे बोधचिन्ह देऊन मोदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्ष लाँच केली जाणार आहे. अवकाशात मानव पाठवून त्याला सुखरुप पृथ्वीवर परत आणून जगाला आपल्या क्षमतेची चुणूक दाखवण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे.अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीची झलक गगनयान मोहिमेतून जगाला दाखवून दिली जाणार आहे.