गडचिरोली, गोंदियात पावसाचा कहर जनजीवन विस्कळीत! वैनगंगेला पूर

भामरागड -पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून भंडाऱ्यात वैनगंगेला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका पडला असून भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या सर्वच तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदी, कुडकेली नाला व चंद्रा नाला तसेच पेरमिली नाल्याला आलेल्या पूरामुळे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद होता. विविध तालुक्यांतील नद्यानाल्यांना आलेल्या पूरामुळे ५० हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा पूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगेला पूर आल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी २५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सखल भागात पाणी शिरले. पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील लातुरमध्येही कालपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावांतील नद्यानाल्यांना पूर आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top