ठाणे – यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २ हजार बस सोडल्या जाणणार आहेत. त्यापैकी १३७ बसचे बुकिंग फुल झाले आहे.
कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी एस. टी. महामंडळाने जादा वाहतूकीचे नियोजन सुरू केले आहे. ठाणे विभागातील सर्व आगारातून तसेच बोरिवली आणि भांडूप येथून मागणीनुसार एस. टी. महामंडळ बसेस सोडते. त्यासाठी महिना -दीड महिना आधीच आरक्षण खुले केले जाते. जुलै महिन्यात ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी ४०५ बसचे आरक्षण खुले करण्यात आले. त्यातील सुमारे १३७ बसचे आरक्षण पूर्ण झाले असून २७० बसचे बुकिंग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी ३ सप्टेंबर पासून चालवल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी कोकणासाठी गणेशोत्सवात सुमारे १९३७ बस सोडण्यात आल्या. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा ठाणे विभागातून सुमारे दोन हजार बस सोडण्याचे नियोजन आहे. चाकरमान्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी ग्रुप बुकिंगचे आरक्षणही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सर्व साध्या बस आहेत. चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.