गाझातील मदत क्षेत्र रिकामे करा इस्रायलकडून पॅलेस्टिनींना आदेश

जेरूसलेम – गाझामध्ये मदत पोचवण्यासाठी निश्चित केलेल्या मार्गाचा काही भाग रिकामा करण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्यदलाने पॅलेस्टिनी नागरिकांना दिले आहेत.या भागात लपून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.

हा मार्ग अत्यंत दाटीवाटीचा आहे.इस्रायलच्या सैन्याच्या आदेशामुळे या भागातील हजारो पॅलेस्टिनींना आपली घरे सोडून मुलाबाळांसह सामानाची गाठोडी घेऊन स्थलांतर करावे लागते आहे. युद्ध सुरू झाल्यापासून हजारों पॅलेस्टिनींना जीव वाचवण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा स्थलांतर करावे लागले आहे.आतापर्यंत सातवेळा स्थलांतर केलेल्या नागरिकांना आता कोठे सुरक्षित आश्रय शोधावा, हे देखील समजेनासे झाले आहे.हमासचे दहशतवादी या सुरक्षित मार्गाच्या आडून इस्रायलवर रॉकेट हल्ले करत आहेत. त्यामुळे या भागात कारवाई केली जाणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या सुरक्षित कॉरिडॉरमध्ये गाझाच्या दक्षिणेकडील मुनवासी मदत क्षेत्राचा पूर्वेकडील भाग आहे. एकूण १४ किलोमीटरच्या या भागामध्ये सुमारे १.८ दशलक्ष पॅलेस्टिनींनी आश्रय घेतल्याचा अंदाज आहे. गाझाच्या दक्षिणेकडील भागात सध्या २.३ दशलक्ष लोकसंख्या आहे. या पॅलेस्टिनींनी या भागात तंबू ठोकले आहेत. येथे स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा देखील नाहीत. सांडपाण्याची व्यवस्था देखील नाही.