श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाच जागांपैकी सर्वात महत्वाची जागा म्हणून ओळख असलेल्या अनंतनाग राजोरी जागेवरील लढत रंजक असणार आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. डीपीएपी कोषाध्यक्ष ताज मोहिउद्दीन यांनी काल श्रीनगरमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
२०२२ मध्ये, काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर, गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. उधमपूर-डोडा मतदारसंघातून गुलाम नबी यांनी जीएम सरूरी यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाचे दोन उमेदवार जम्मू-काश्मीरच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी)अनंतनाग राजोरी या जागेवरून आपला उमेदवार जाहीर केला. त्यानंतर काल लागेचच गुलाम नबी अनंतनागमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. एनसीने विद्यमान खासदार हसनैन मसूदी यांचे तिकीट रद्द करून गुज्जर-पहारी नेते मियां अल्ताफ यांना या जागेवरून उभे केले आहे. ६६ वर्षीय अल्ताफ हे पाच वेळा आमदार आणि फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये माजी मंत्री आहेत.