गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट आता रद्द

कोल्हापूर- गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.मात्र दूधपुरवठा सुरू ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

‘गोकुळ’ ची ही पोटनियम दुरुस्ती सर्वसाधारण सभेपुढे ठेवली असून यामुळे जिल्ह्यातील कमी दूध संकलन असणाऱ्या संस्थांना आता दिलासा मिळाला आहे.अहवालाच्या मुखपृष्ठातही या दूध संघाने बदल केला आहे. पूर्वीच्या वेळ मोजण्याच्या वापरल्या जाणार्‍या वाळूच्या घड्याळाच्या चित्रासह आता ‘सकस ओला-सुका चारा द्या आणि मुबलक दूध घ्या’ ही संकल्पना मांडली आहे. ‘गोकुळ’ दूध संघाची ६२ वा वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑगस्टला दुपारी एक वाजता पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. यातील विषयपत्रिकेवर सॅटेलाईट डेअरी उदगावलगतची जागा खरेदी करणे, पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करणे आदी विषयांचा समावेश आहे.