वास्को- दक्षिण गोवा जिल्ह्यातील मूरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी येथील फिशिंग जेट्टीच्या खासगीकरणाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच कुठ्ठाळी गावात सरपंच सानिया परेरा यांनी घेतलेल्या ग्रामसभेत या फिशिंग जेट्टीच्या खासगीकरणाला विरोध असल्याचा पुन्हा सूर उमटला.
सरपंच सानिया परेरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. यामध्ये कुठ्ठाळीच्या फिशिंग जेट्टीच्या दुरुस्तीला परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे रोमी कोकणी लिपीला समान दर्जा देणे,महिलांच्या सुरक्षेसाठी पिंक फोर्सने गस्त घालणे,सनबर्नला विरोध करणे आदी ठराव यावेळी करण्यात आले.या ग्रामसभेत रस्त्याच्या कडेला बसून मासे विक्री करणाऱ्या मासे विक्रेत्यांनी सोपो दर २०० रुपयांऐवजी ५० रुपये करावा अशी मागणी केली.
मात्र ही मागणी सरपंच सानिया परेरा यांनी फेटाळली.