चंद्रपूर – वरोरा तालुक्यातील
माजरी येथील कालिमाता मंदिरात चैत्रातील नवरात्र उत्सवाच्या महाप्रसादातून तब्बल १२५ जणांना
विषबाधा झाली.काल शनिवारी घडलेल्या या घटनेत ८० वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
विषबाधा झालेल्यांमध्ये
६ पुरुष,३० महिला व २४ लहान मुलांचा समावेश आहे.माजरी येथील कालीमाता मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते.महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्या होऊ लागल्या.त्यामुळे त्यांना लगेच माजरी येथील वेकोली,माजरी आणि वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.या सर्वांवर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनात तत्काळ उपचार करण्यात आले. ६९ विषबाधाग्रस्तांपैकी सहा जणांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यापैकी गुरुफेन यादव या ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.
विषबाधाग्रस्तांपैकी अन्य गंभीर पाच जणांची नावे आर्यन राजपुता (५),
अभिषेक वर्मा (५),आशय राम (३),सोमय्या कुमार दीड वर्ष, देवांश राम अडीच वर्ष अशी आहेत.विषबाधा झालेल्यांपैकी माजरीतील प्राथमिक उपचार केंद्रात १० जण,वेकोलीच्या रुग्णालयात २५ ते ३० जण दाखल असून काहीजण चंद्रपूर व वणी येथे उपचार घेत आहेत.