चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल

नवी दिल्ली – राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. मिझोरामच्या ४० विधानसभा जागांचा निकाल मात्र लांबणीवर पडला असून तो ४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभा निकालातून आगामी लोकसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार असल्याने या निकालांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे तर राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणात बीआरएस पक्षाचे सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. बहुमतासाठी ११६ जागांची आवश्यकता आहे. भाजप येथे सत्ता राखण्यात यशस्वी होईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
राजस्थानात १९९ जागांसाठी मतदान झाले. बहुमताची मॅजिक फिगर येथे १०० आहे. राजस्थानात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तापालट होतो, असे आतापर्यंतचे चित्र आहे. सध्या राजस्थानात काँग्रेसची सत्ता आहे.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. बहुमतासाठी ४६ जागा आवश्यक आहेत. येथे काँग्रेस आणि भाजपात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
तेलंगणात ११९ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक झाली. येथे बहुमताचा आकडा ६० आहे. २०१४ ला तेलंगण राज्याची स्थापना झाल्यापासून गेली नऊ वर्षे येथे के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची सत्ता आहे. पण यावेळी तेलंगणात काँग्रेसचे वारे वाहत असल्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top