छत्तीसगड
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर भागात आज सकाळपासून पुन्हा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. जवानांनी आतापर्यंत या ठिकाणावरून १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये ११ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी शोध मोहीम आहे.
काल सकाळी झालेल्या चकमकीनंतर २४ तास सतत शोधकार्य सुरू होते. कोब्रा २१० बटालियन आणि डीआरजीचे जवान चकमकीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. काल संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती. चकमक झालेल्या जंगल भागात अनेक जखमी नक्षलवादी लपून बसल्याची माहितीही सुरक्षा दलांना मिळाल्याने जवानांनी संपूर्ण जंगलाला रात्रभर वेढा घातला. आज पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात आली. बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, ‘सुरक्षा दलांना नक्षलवादी नेता पापा राव बिजापूरच्या सेंद्रा हा या भागात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. काल दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला होता. गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून त्यांच्याकडे एके ४७, एलएमजी सारखी स्वयंचलित शस्त्रे सापडली आहेत.’