रायपुर – सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाते, असा समज आहे. मात्र छत्तीसगड सरकारने राज्यातील नक्षलप्रभावित आणि आदिवासी भागांतील सरकारी शाळांतही दर्जेदार शिक्षण व कौशल्य विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील सुमारे ८०० सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना रोबोटिक तसेच एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे दिले जाणार आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या काळातील गरजांच्या अनुषंगाने या भागांतील मुले आता कौशल्य शिक्षणाद्वारे नवीन विषय शिकतील. त्यादृष्टीने मॅजिक बस फाउंडेशनशी करार करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील ८०० सरकारी शाळांमध्ये सुरुवातीच्या दोन वर्षांत कौशल्य शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी १,६०० शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून हे शिक्षक इयत्ता सहावी ते दहावीतील ४० हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देतील.