बंगळुरू – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री एआयएडीएमके पक्षाच्या माजी अध्यक्षा दिवंगत जे जयललिता यांचे दागिने ६ आणि ७ मार्च रोजी तामिळनाडू सरकारच्या स्वाधीन करावेत,असे निर्देश बंगळुरुतील विशेष न्यायालयाने दिले आहेत.
जयललिता यांच्यावरील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हे दागिने पुरावा म्हणून कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते आता तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याने या प्रकरणी जयललिता यांना न्यायालयाने ठोठावलेल्या शंभर कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जयललिता यांच्या जप्त केलेल्या एकूण दागिन्यांपैकी फक्त २० किलो दागिन्यांची विक्री करण्याची परवानगी न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिली आहे. उर्वरित दागिने हे जयललितांना त्यांच्या आईकडून मिळाले होते. त्यामुळे त्या दागिन्यांची विक्री करता येणार नाही,असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.