जरांगेंची सपशेल माघार! उपोषणही सोडले आततायी आंदोलनानंतर नरमले

जालना – मराठा आरक्षण आंदोलन नेते जरांगे पाटील यांनी काल भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत बेसुमार टीका केल्यानंतर सरकार भडकले. सत्तेतील तीनही पक्षाच्या नेत्यांनी जरांगेंवर निशाणा साधला. विरोधी पक्षही जरांगेपासून दूर झाले. आपण एकटे पडलो हे जरांगे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पूर्ण माघार घेतली. अंतरवालीला परत जाऊन त्यांनी आमरण उपोषणही सोडले.
यापूर्वी एसटी कर्मचार्‍यांना सरकारमध्ये विलीन करा अशी मागणी करीत गुणरत्न
सदावर्तेंनी आंदोलन छेडले होते. पण त्यांचा तोल गेला आणि त्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर हल्ला घडवून आणला. त्यांच्या भाषणात आणि कृतीत अतिरेक येताच त्यांना मिळत असलेला पाठिंबा संपला, आंदोलन फसले, वकिलीचा हक्क गेला आणि माघार घ्यावी लागली. आज जरांगे पाटील यांचेही तेच झाले. त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी उंचीवर नेलेले आंदोलन त्यांच्याच आततायी वाणीने व कृतीने आता संपल्यात जमा आहे. आज तीच अवस्था जरांगे यांची झाली आहे.
मात्र याचा सरकारमधील तीनही पक्षांना फटका बसणार आहे. कारण मराठ्यांना जे दहा टक्के आरक्षण दिले त्याने मराठा खूष नाहीत. हे आरक्षण टिकणार नाही हे मराठ्यांना उमजले आहे. त्यामुळेच मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्याचा जल्लोष फक्त विधानभवनात साजरा झाला. महाराष्ट्रात कुठेही असा जल्लोष
झाला नाही.
रविवारी नाट्यमय घडामोडींनंतर अचानक कारमधून मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे संचारबंदी लागू असल्यामुळे भांबेरी गावातूनच आज मागे फिरले. त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्यांनी आपले उपोषण सुरू ठेवले होते. कोणी कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या मागणीवरून तसूभरही मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार जरांगे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आजच्या आज सगेसोयरेबाबतचा अध्यादेश लागू करा,अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र दुपारी त्यांनी उपोषण थांबवत सरकारला दोन-तीन दिवसांची मुदत दिली आणि साखळी उपोषणाचा
निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याने नवीन डाव टाकणार असे जरांगे यांनी सांगितले. आमचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकार सर्व बाजूंनी प्रयत्न करीत आहे. इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पेट्रोल पंप काल रात्रीच बंद केले. आंदोलक घाईने गाड्या घेऊन निघाले होते, पण पेट्रोल पंप बंद केल्याने त्यांना औरंगाबाद पर्यंतचा पल्लाही गाठता येणे शक्य नव्हते. चालत मुंबईला पोचणे शक्य नाही त्यामुळे आम्ही मागे फिरलो. आजही पेट्रोल पंप बंद आहेत. उद्याही बंद ठेवतील. म्हणजे आमच्या गाडयांना पेट्रोल-डिझेलही मिळू देणार नाहीत. आज आपण अर्ध्या वाटेतून परत आलो आहे. मात्र याचा अर्थ सरकारसमोर माघार घेतली असा होत नाही. सगेसोयरे शब्दावर आम्ही ठाम आहोत. संचारबंदी आदेश धुडकावून आम्हाला नाहक संघर्ष ओढवून घ्यायचा नाही. आंदोलनात एकाही मराठ्याचा बळी जाता कामा नये. कारण एक एक मावळा सध्या गरजेचा आहे. एक मावळा आपल्याला गड जिंकून देऊ शकेल. आपल्या हट्टापायी संपूर्ण मराठा समाजाला त्रास होता कामा नये, आज काही मराठा बांधव पायी चालत भांबेरीपर्यंत आले होते. त्यांना माघारी जाण्यास सांगण्यात आले आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे यांनी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आपल्याला सागर बंगल्यावर यायला सांगितले. सागर बंगल्यावर या, तुमचे स्वागत आहे, असे देवेंद्र फडणवीस काल म्हणाले. परंतु आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो तर संचारबंदी लागू करून आम्हाला अडविले.फडणवीस यांच्यात काही दम नाही, सागर बंगल्याचे दरवाजे बंद केल्यामुळे फडणवीस यांचा पराभव झाला आहे. मराठ्यांचा विजय झाला आहे,असे सांगताना संचारबंदी उठवा, मग मुंबईला येतो,असे थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जरांगे यांनी सकाळी दिले. दुपारी मात्र उपोषण थांबवताना त्यांनी नरमाईचे
धोरण स्वीकारले.

इंटरनेट, एसटी सेवा बंद
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी चार वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली. अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तर छ.संभाजीनगर जिल्हयातील सर्व आगारांमधील एसटी सेवा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. सकाळी काही काळ एसटी सेवा बंद होती. मात्र दुपारनंतर ती पूर्ववत सुरू करण्यात आली. काल अंबडमध्ये मराठा आंदोलकांनी एक एसटी बस पेटवून
दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top