जलील हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करतात! डॉ. कादरींचा आरोप

छत्रपती संभाजीनगर – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन’चे (एमआयएम) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे केवळ फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करतात. अतुल सावे यांना निवडून आणण्यासाठी कमकुवत उमेदवार देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते ‘चीटर’ आहेत, असा आरोप करून एमआयएमचे कार्याध्यक्ष डाॅ. गफ्फार कादरी यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला. यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
डाॅ. गफ्फार कादरी म्हणाले की,राज्यात एमआयएममध्ये मोठी फूट पडणार आहे. राज्यातील अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष माझ्या संपर्कात आहेत. ते माझ्यासोबत राजीनामा द्यायला तयार आहेत. पुढे ते म्हणाले कॉँग्रेस प्रवेशाबाबत अद्याप काही निश्चित नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी मी संपर्कात आहे. ही जागा आघाडीत काँग्रेसला सुटलेली आहे. त्यामुळे माझे प्रयत्न सुरू आहेत. अंबादास दानवे यांच्या विधान परिषद निवडणुकीत काही नगरसेवक माझ्याकडे आले होते. इम्तियाज यांनी निवडणुकीत सौदेबाजी केली. मात्र नगरसेवकांना पैसे मिळाले नाहीत, असा आरोप डाॅ. कादरी यांनी पत्रकार परिषदेत केला. २०१९ मध्ये मी एमआयएम आणि वंचित आघाडी करवून आणली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मी चर्चा केली. इम्तियाज जलील केवळ यामुळेच खासदार झाले. मात्र, तेच ‘वंचित’ सोबतची आघाडी तोडण्यास जबाबदार आहेत. ही आघाडी राहिली असती तर १५ ते २० आमदार निवडून आले असते. मात्र, इम्तियाज यांना हे नको होते. त्यांना केवळ स्वत:लाच मोठे व्हावेसे वाटते. इतर कुणी सत्तेत नको म्हणून त्यांनी ही आघाडी तोडली.