झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी गीता कोडांचा भाजपात प्रवेश

रांची

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी आणि सिंहभूमच्या काँग्रेस खासदार गीता कोडा यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी रांची येथील भाजपा पक्ष कार्यालयात खासदार गीता यांचे स्वागत केले. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी विरोधी पक्षनेते अमर बौरीही उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने केलेल्या युतीवरून गीता कोडा नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. यानंतर आज त्यांनी भाजपात प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर गीता कोडा यांनी सांगितले की, काँग्रेसचे कोणतेही धोरण नाही, विचार नाही. पक्षाने देशाला अडचणीत नेण्याचे काम केले आहे. मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यामागचे कारण सर्वांना माहीत आहे. काँग्रेसने ज्या प्रकारे देशाला खड्ड्यात टाकले आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा करते, पण कुटुंबाला सोबत घेत आहे. राजकारणाचा उद्देश जनतेची सेवा करणे आहे. जनतेमध्ये राहण्यासाठी. ज्या पक्षात जनहिताकडे दुर्लक्ष होत आहे, त्या पक्षात राहण्याचे कोणतेही औचित्य नाही. आता मी भाजपसोबत जनतेची सेवा करणार आहे. मोदींच्या स्वप्नांच्या भारतामध्ये माझी जी काही भूमिका असेल ती मी निभावणार आहे.

प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी म्हटले की, गीता कोडा दोन वेळा आमदार, खासदार झाल्या आणि अजूनही राजकारणात सक्रियआहेत. त्या काँग्रेसच्या कार्याध्यक्षाही होत्या. नरेंद्र मोदींच्या कामाने प्रभावित होऊनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गीता कोडा यांच्या योगदानामुळे भाजप केवळ कोल्हानमध्येच नव्हे तर संपूर्ण झारखंडमध्ये नव्या ताकदीने आणि नव्या उर्जेने काम करेल. आता झारखंडमधील लोकसभेच्या १४ जागा भाजपच्या खात्यात येतील. झारखंडच्या सर्व जागा आम्ही नरेंद्र मोदींच्या खात्यात देऊ. गीता गोडा या २००९ ते २०१९ या काळात दोनदा आमदार झाल्या आहेत. त्या पहिल्यांदाच सिंहभूम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top