लॉस एंजलिस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीच्या दिशेने जाणाऱ्या एका सशस्त्र व्यक्तीला काल पोलिसांनी अटक केली. त्याच्या गाडीमध्ये भरलेले पिस्तुल, काडतुसे व काही बनावट पासपोर्ट आढळले आहेत. ट्रम्प यांच्यावर याच्या रॅलीत शस्त्रधारी व्यक्ती पकडली जाण्याची ही तिसरी घटना आहे.अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू असून ट्रम्प यांची एक रॅली काल कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आली होती. तिथून जवळ असलेल्या कोचेला येथील अॅव्हेन्यू ५२ या ठिकाणी असलेल्या एका तपासणी नाक्यावर शस्त्र घेऊन चाललेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडे एक भरलेली बंदूक, एक पिस्तुल व काही काडतुसे आढळली असून त्याच्या गाडीत काही बनावट पासपोर्टही सापडले आहेत. तो ट्रम्प यांच्यावर हल्ला करायला आला होता, असा संशय आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात सादर केले असता त्याची ५ हजार डॉलरच्या जातमुचलक्यावर सुटका झाली. ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत दोनवेळा हल्ले करण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
