ठाकूर बांके बिहारी मंदिरात वृद्धाचा गर्दीत गुदमरून मृत्यू

मथुरा- उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात आज सकाळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये गुदमरून हरियाणातील एका वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या मृत भाविकाचे नाव ममचंद सैनी (६५)असे असून ते हरियाणातील रहिवासी होते.

ठाकूर बांके बिहारीजींच्या दर्शनासाठी आज सकाळी हरियाणातील ममचंद सैनी हे भाविक आले होते. आठवड्याचा शेवटचा दिवस आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.या गर्दीतच ममचंद सैनी दर्शनासाठी काही अंतरावर गेल्यानंतर गर्दीच्या दबावाने बेशुद्ध पडले.त्यांना तातडीने वृंदावन जिल्हा संयुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या वृद्ध भक्ताला मृत घोषित केले.रुग्णालयाचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.शशी रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात येण्यापूर्वीच या भक्ताचा मृत्यू झाला होता.