डेंग्यू प्रकरणी नाशिक रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस बजावली

नाशिक

नाल्यावर बेकायदेशीर बांध करून डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण केल्याचा ठपका ठेवत नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधकांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डेंग्यू प्रकरणी महापालिकेने आतापर्यंत १०५८ नागरिक तसेच शासकीय, खासगी आस्थापनांवर कारवाई केली आहे. बांधकामांच्या साईट या डेंग्यूची उत्पत्तीस्थाने ठरत असल्याने बांधकाम परवानग्यांची माहितीही वैद्यकीय विभागाने नगररचना विभागाकडून मागविली आहे.

नाशिक शहरात यंदा डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या तब्बल १९३ नवीन बाधितांची नोंद झाली होती, तर डेंग्यूच्या तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांच्या अध्यक्षतेखालील साथरोग मृत्यू संशोधन समितीने महापालिकेची कानउघाडणी केली. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही समितीने दिल्या. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये डेंग्यू रूग्णांचा आकडा कमी होणे अपेक्षित होते पंरतु नोव्हेंबरमध्ये तब्बल २७२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यात आता दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बळींचा आकडा तीनवर गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून, डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध सुरू केला आहे. त्यात नाशिकरोड विभागातील गोसावीवाडी परिसरातून जाणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यावर रेल्वे विभागाने तीन ठिकाणी बंधारे बांधले आहेत. बंधाऱ्यांत साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे महापालिकेने नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना नोटीस बजावली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top