पेनसिल्व्हेनिया – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत असताना एका हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. बंदुकीची गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांच्याभोवती कडे करून त्यांना तिथून बाहेर नेले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प दुसर्या ठिकाणच्या प्रचार सभेला उपस्थितही राहिले. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ठार केले आहे. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आहे. ज्यो बायडन आणि ओबामा यांनी या हल्ल्याचा निषेध करीत राजकारणात द्वेषाला स्थान नाही असे ते म्हणाले.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे आज ट्रम्प यांची निवडणूक सभा होती. अमेरिकन वेळेनुसार संध्याकाळी सव्वासहा वाजता ट्रम्प या सभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. ट्रम्प यांच्या कानाजवळून काहीतरी गेले. त्यानंतर ते लगेच खाली वाकले. सुरक्षारक्षकांनी तातडीने व्यासपीठावर धाव घेतली. सभास्थळी नेमके काय घडले, हे क्षणभर कुणाला कळलेच नाही. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली. गुप्तहेर पोलिसांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती गराडा घातला. त्यावेळी ट्र्म्प यांच्या उजव्या कानाभोवती रक्त ओघळत होते. या परिस्थितीतही ट्रम्प उठून उभे राहिले आणि गर्दीकडे पाहून हाताची मूठ आवळत फाइट असे म्हटले. काही क्षणांनंतर सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांना तिथून दूर नेले. या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गोळीबारात सभेला उपस्थित असलेल्यांपैकी एक जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे.
हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर एकूण पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. त्याने एका इमारतीच्या छतावरून ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर काही सेकंदातच ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या रक्षकांनी या हल्लेखोर तरुणाला ठार केले. त्याचा मृतदेह छतावरच पडून होता. थॉमस मॅथ्यू असे नाव असलेला हा तरुण अवघ्या वीस वर्षांचा होता. तो समारंभापासून 60 किलो अंतरावरील बेथल पार्कचा रहिवासी होता. त्याच्याकडे एआर-15 ही रायफल होती. पोलिसांनी ती घटनास्थळावरून जप्त केली आहे. सभेला उपस्थितांपैकी काहींनी या तरुणाची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही, असे सांगितले जात आहे.
हल्ल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, गोळीबारावर त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे आभार. आपल्या देशात असे कृत्य घडणे हे अविश्वसनीय आहे. हल्लेखोरांबद्दल सध्या काहीही माहिती नाही. गोळी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली. ट्रम्प म्हणाले की, मी गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर मला लगेच कळले की काहीतरी गडबड आहे. बंदुकीची गोळी माझ्या त्वचेला घासून गेल्यासारखे वाटली. रक्तस्त्राव झाला तेव्हा मग मला कळले की, काय होत आहे. देव अमेरिकेला आशीर्वाद देवो.
ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचे कळताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले की, सरकारच्या सर्व यंत्रणांनी मला परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. मी डोनाल्ड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांच्या डॉक्टरांसोबत आहेत. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. मी गुप्तचर सेवांसह सर्व एजन्सींचे आभार मानतो. या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये (एक्स) म्हटले आहे की, माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.