इस्लामाबाद –
पाकिस्तानच्या लाहोरमधील अचरा बाजारात एका महिला तिच्या पतीसह एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसवर अरबी अक्षरात काही मजकूर लिहिला होता. मात्र महिलेच्या ड्रेसवर लिहिलेला तो मजकूर हा कुराणातील आयातींशी संबंधित आहे, असा दावा हॉटेलमधील काही जणांनी केला. यानंतर तेथील जमावाने संताप व्यक्त करत महिलेला घेराव घातला. काही लोकांनी त्या महिलेचा कुर्ता फाडण्याचादेखील प्रयत्न केला. या घटनेची एक व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
महिलेच्या कुर्त्यावर लिहिलेला मजकूर कुराणातील मजकूर आहे असे अनेकांना वाटले. त्यामुळे तेथील लोकांनी महिलेवर धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप करत महिलेला घेरले. महिलेच्या कर्त्यावरील मजकुरामुळे इस्लाम धर्माची खिल्ली उडाली. महिलेने ईशनिंदा केल्याचे म्हणत तिला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जमावाने केली. महिलेने त्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही तिचे ऐकले नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर एक महिला पोलीस अधिकारी सय्यदा शहाराबानो नक्वी तेथे दाखल झाल्या. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत महिलेला हॉटेलमधून सुखरूप बाहेर आणले. दरम्यान या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला अत्यंत घाबरलेली दिसत आहे. तर पोलीस अधिकारी त्या महिलेला संरक्षण देत संतप्त जमावातून सुखरूपपणे बाहेर घेऊन येत आहेत.
महिला पोलीस अधिकारी सय्यदा यांनी दाखविलेल्या या शौर्याबद्दल पंजाब पोलिसांनी त्यांना मानाच्या ‘कायद-ए-आजम’ पुरस्काराने सन्मानित केले. याबाबत महिला पोलीस अधिकारी सय्यदा यांनी सांगितले की, ‘महिलेने परिधान केलेल्या कपड्यांवर साधे अरबी शब्द होते. कुराणातील आयातीशी संबंधित काहीही लिहिलेले नव्हते. मात्र, प्रकरण शांत झाल्यानंतर पीडित महिलेने मौलवींसमोर माफी मागितली. तिचा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता आणि भविष्यात असे कपडे घालणार नसल्याचेही तिने सांगितले.’
या घटनेनंतर संबंधित महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी महिलेने सांगितले की, मला कुर्ता आवडला म्हणून मी तो विकत घेतला. लोक असा विचार करतील, असे वाटले नव्हते. माझा कोणालाही दुखावण्याचा किंवा कुराणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता.