तर राजकीय करिअर संपवू जरांगेंचा भाजपाला इशारा 

छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाला दिला. २९ ऑगस्टला योग्य तो निर्णय घेऊ असेही जरांगे म्हणाले. 

आपले मूळ गाव मातुरीमध्ये यात्रेसाठी निघण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला मोठे करायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणारे आहोत. सरकारकडून हा विषय विरोधकांवर ढकलला जात आहे. उद्या विरोधक नाही म्हणाले तर आम्हाला सरकार आरक्षण देणार नाही का असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. 

मराठयांना ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे, यावर उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी. विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने वाट बघू नये. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. उद्या विरोधक नाही म्हणाले तरी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतल्यास राज्यातील मराठा सरकारला डोक्यावर घेईल, असे जरांगे म्हणाले.

आम्ही महाविकास आघाडी किंवा महायुतीचे विरोधक नाही. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, आरक्षण मिळाले नाही तर आम्हाला नाईलाजाने २८८ जागा पाडायच्या की आपले उमेदवार उभे करायचे याचा निर्णय घ्यावा लागेल. १४ ते २० ऑगस्ट उमेदवारांची यादी करू. २० ते २७ ऑगस्टला या यादीवर चर्चा करून २९ ऑगस्ट रोजी काय करायचे ते ठरवू, असे जरांगे म्हणाले.