आग्रा – मुस्लिम मशिदी ही मुळात हिंदू मंदिरे होती असे दावे वाढत असून अनेक वास्तूत त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे. त्याच विचाराने आता प्रसिध्द ताजमहाल हा तेजोमहाल होता हा दावा पुढे आला असून अनेकजण ताजमहालच्या घुमटावर गंगाजल अर्पण करू लागले आहेत. या घटना वारंवार घडल्याने आता अखेर ताजमहाल मध्ये पाण्याची बाटली नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काल दुपारी एक महिला भगवा झेंडा घेऊन ताजमहालच्या मुख्य घुमटावर गेली. तिथे तिने गंगाजल अर्पण केले. दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांनी या प्रकारे ताजमहालमध्ये गंगाजलाने अभिषेक केला होता. या घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व
सर्वेक्षण खात्याने ताजमहालच्या मुख्य घुमटावर बाटलीतून पाणी नेण्यास बंदी घातली आहे. काल दुपारपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ताजमहाल हा मूळ हिंदूंचा तेजोमहाल आहे, असा हिंदूधर्मीयांचा दावा आहे. या ठिकाणी पूजापाठ करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी ‘हिंदू महासभा’सारख्या काही संघटना गेली काही वर्षे करत आहेत. ताजमहाल हा जुने शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिकाही दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यानंतर आता ताजमहालाच्या मुख्य घुमटावर जाऊन गंगाजल अर्पण करण्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांनी ताजमहालाच्या मुख्य घुमटावर गंगेच्या पाण्याने जलाभिषेक केला होता. ते दोन तरुण हिंदू महासभेचे सदस्य होते. काल भगवा झेंडा घेऊन ताजमहालच्या घुमटावर गंगाजल अर्पण करणारी महिलाही हिंदू महासभेची पदाधिकारी आहे, असा दावा संघटनेने केला आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ताजमहालाचे व्यवस्थापन करणार्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने पाण्याच्या बाटल्या मुख्य घुमटावर नेण्यास आता बंदी घातली आहे. मुख्य घुमटावर जाण्यापूर्वी पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या चमेली फरशीवर ठेवलेल्या कचर्याच्या डब्यात टाकाव्या लागणार आहेत. त्यानंतरच पर्यटकांना मुख्य घुमटावर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव हा नियम लागू करण्यात आला आहे, असे ताजमहालचे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक प्रिन्स वाजपेयी यांनी सांगितले आहे. मात्र, या निर्णयाला काही जणांनी विरोध केला आहे. उत्तर प्रदेश टुरिस्ट गाईड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दान म्हणाले की, हा निर्णय पर्यटकांच्या हिताचा नाही. उष्ण आणि दमट हवामानात पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या न घेऊन जाऊ देण्याचा आदेश चुकीचा आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा. त्याऐवजी सुरक्षा कर्मचार्यांनी
पाळत वाढवावी.