‘तारक मेहता’ फेम सोढी २५ दिवसांनी घरी परतला

नवी दिल्ली

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोढी उर्फ अभिनेता गुरचरण सिंग काल त्यांच्या घरी परतले आहेत. गुरचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होते. काल अखेर २५ दिवसांनी ते घरी परतले आहेत. आपण आध्यात्मिक प्रवासासाठी गेलो होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. काल अखेर गुरुचरण सिंग त्यांच्या घरी परतले आहेत.

गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पोलीस चौकशीत गुरुचरण सिंग यांनी सांगितले की, ‘मी सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक प्रवासासाठी गेलो होतो. आता मी स्वतः घरी परतलो आहे. अमृतसर, लुधियानासह अनेक वेगवेगळ्या शहरांत मी गेल्या २५ दिवसांपासून होतो. शहरांतील वेगवेगळ्या गुरूद्वारांमध्येच मी वास्तव्य केले. काही दिवसांनंतर घरी जाण्याची जाणीव झाल्यामुळे मी आता घरी परतलो आहे.’

गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी एअरपोर्टवर गेले. पण ते मुंबईला न जाता बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुरुचरण यांनी २२ एप्रिल रोजी एटीएममधून ७,००० रुपये काढले होते, त्यानंतर त्यांचा फोन बंद होता, असे पोलिसांनी सांगितले. यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून गुरुचरण सिंग यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top