तारगाव-मसूर-शिरवडे रेल्वेताशी ९० किमी वेगाने धावणार

पुणे

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. तारगाव-मसूर-शिरवडेदरम्यान १७.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या कामाची पाहणी केली. त्यानंतर मनोज अरोरा यांनी या मार्गावरून ९० किमी प्रतितास वेगाने रेल्वे धावण्यास मान्यता दिली आहे. कालांतराने ह्या वेग वाढवून ११० किमी प्रतितास केला जाईल.

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी सुरुवातीला ट्रॉलीवर बसून तारगाव-मसूर-शिरवडे खंडाच्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी इंजिनमध्ये बसून प्रतितास १३१ किलोमीटर वेगाने धावून रुळांची क्षमता तपासली. तसेच सिग्नल व अन्य तांत्रिक बाबीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रतीतास ९० किमी वेगमर्यादेला मंजुरी दिली. या वेळी मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, मुख्य अभियंता (बांधकाम) सुरेश पाखरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे-मिरज हा २७९ किलोमीटरचा मार्ग आहे. २७९ पैकी २१३ किलोमीटरच्या अंतरावर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. उर्वरित ६७ किलोमीटरच्या अंतरावर दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी किमान १० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबर २४ अखेर हे काम पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top