तैवान
पूर्व तैवानमधील हुआलियन शहरात आज सर्वात शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्याचे धक्के जपान आणि फिलिपाइन्सपर्यंत जाणवले. तैवानच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ७३६ जखमी झाले आहेत. बहुतांश रस्ते खाचल्याने बाधित ठिकाणी डॉक्टर न पोहोचू शकल्याने जखमींना उपचार मिळणे कठीण झाले आहे.
या भूकंपाचे केंद्र पृथ्वीपासून ३४ किलोमीटर खोलवर होते. भारतीय वेळेनुसार पहाटे ५:३० च्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे भूस्खल झाले. तसेच अनेक इमारतीही जमीनदोस्त झाल्या. या भूकंपांनंतर जपानच्या हवामान खात्याने समुद्रात सुमारे १० फूट उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली. याशिवाय जपानने त्सुनामीचा इशारा दिला होता, मात्र तो नंतर हटवण्यात आला. या तीव्र भूकंपानंतर तैवानमधील ९१ हजारांहून अधिक घरे वीजेविना आहेत. यात तारा आणि वीज प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. जपानच्या ओकिनावा प्रांतात देखील भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. येथून ये-जा करणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबाबत परिवहन मंत्रालयाने माहिती दिली. दरम्यान, तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोच्या मते, तैवानमध्ये २५ वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. याआधी १९९९ मध्ये ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा २ हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते.