दलबदलू उमेदवाराला पुन्हा निवडून देऊ नका! पुण्यातील बॅनर चर्चेत

पुणे – सत्तेसाठी वाट्टेल तशा कोलांटउड्या मारून एका रात्रीत पक्ष बदलणार्‍या लोकप्रतिनिधींबद्दल मतदारांच्या मनात खदखद आहे. हीच खदखद पुण्यात लागलेल्या एका बॅनरवरून दिसून आली असून, या बॅनरवर, निवडून आल्यानंतर पाच वर्षे मतदारांशी प्रामाणिक राहून दुसर्‍या पक्षात जाणार नसल्याचे जाहीरपणे लिहून देणार्‍या उमेदवारालाच मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. या बॅनरची पुण्यात जोरदार चर्चा होत आहे.
निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना पुण्यातील अप्पा बळवंत चौकात हा बॅनर झळकला आहे. ‘जागृत पुणेकर, सुसंस्कृत पुणेकर’ या नावाने लागलेल्या या बॅनरवर ‘रहा एक पाऊल पुढे, महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी’ असेही लिहिले आहे. ‘जागृत पुणेकरांचे आवाहन. उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी आपल्या परिचय पत्रकामध्ये एकच उल्लेख करावा. मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय-धोरणाशी आणि मतदारांशी पाच वर्षे प्रामाणिक राहणार, कोणत्याही दुसर्‍या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तींना निवडून देवू नका,’ असा मजकूर या
बॅनरवर आहे. हा बॅनर कोणी लावला, कधी लावला हे समजू शकलेले नाही. मात्र, सर्वसामान्य मतदारांची भावनाच या बॅनरमधून व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या स्वार्थासाठी दुसर्‍या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आपल्यावरील वेगवेगळ्या प्रकराच्या अनेक केसेस रद्दही करवून घेतल्या. परंतु हे करताना त्यांना निवडून देणार्‍या मतदारांना त्यांनी विचारलेही नाही. या नेत्यांना या बॅनरमधून हा टोला लगावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

आ. रवींद्र धंगेकर
भाजपाकडून ट्रोल

पुणे मतदारसंघात भाजपाने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनी प्रचार सुरू केला असताना भाजपाकडून रवींद्र धंगेकर यांना ट्रोल करण्यात येत आहे. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असे लिहिलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. भाजपाने सोशल मीडियाचा वापर करून धंगेकरांच्या शिक्षणाबद्दल त्यांना ट्रोल केले आहे. मात्र, या ट्रोलिंग धंगेकरांनी फारसे मनावर घेतलेले नाही, उलट त्यांनी या टीकाकारांना पुरेपूर समाचार घेत चोख प्रत्युत्तर दिले. ‘ते माझ्या शिक्षणावर घसरले आहेत म्हणजे त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेने मला पीएचडीचे प्रमाणपत्र दिले आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top