चेन्नई – आयपीएलच्या १७ व्या हंगामाला आता काही तासच शिल्लक राहिलेले असताना , चेन्नई सुपर किंगला ५ वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या, महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याच्या जागी आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करणार आहे.त्यामुळे उद्या चेन्नई विरुद्ध बंगळूरू यांच्यातील उद्घाटनाच्या सामन्यात ऋतुराजच्या नेतृवाखाली चेन्नईचा संघ मैदानात उतरेल.
महेंद्रसिंह धोनी २०२४ मध्ये चेन्नई संघाचा कर्णधार नसेल अशी अनिल कुंबळेने भविष्यवाणी केली होती. ती खरी ठरली आहे . स्वतः धोनीनेही कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्याने कर्णधारपद सोडले. यापूर्वी २०२२ मध्ये धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार करण्यात आले होते. पण त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यामुळे त्याला हटवण्यात आले. त्यानंतर धोनी पुन्हा कर्णधार झाला. धोनी आयपीएल मध्ये २५० सामने खेळला आहे. त्याने ३८.७९ च्या सरारीने ५०८२ धावा केल्या आहेत. त्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड शांत आणि मनमिळावू स्वभावाचा म्हणून ओळखला जातो . चेन्नई संघातून खेळताना त्याने अनेक वेळा चांगली फलंदाजी करून संघाच्या विजयाला हातभार लावला होता. शिवाय त्याने महाराष्ट्राचे नेतृत्वही केले आहे.चेन्नईच्या कर्णधार पदी निवड होणार असल्याचे २ दिवसांपूर्वीच त्याला समजले होते. त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबियांना चेन्नईत बोलावून घेतले आहे.