यवतमाळ
नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या महामार्गावरील यवतमाळच्या चापरडा गावाजवळ आज पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हे सर्वजण पंजाबमधील आहेत.
हे शीख कुटुंब नांदेड येथे दर्शनसाठी जात होते. यवतमाळमार्गे ते नांदेडला जाताना हा भीषण अपघात झाला. चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. सध्या या अपघाताचा अधिक तपास यवतमाळ पोलीस करत आहेत.