पणजी- फोंडा तालुक्यातील खांडेपार पंचायत क्षेत्रातील पाचमे गावात विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची वाट बिकट बनली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नाल्यावर टाकलेल्या वीज खांबाचा आधार घ्यावा लागत आहे. हे विद्यार्थी दररोज नाल्यावर टाकलेल्या वीज खांबावरून ये-जा करीत आहेत.
पाचमे गावात कित्येक वर्षांपासून नाल्यावर साकव उभारण्याची मागणी प्रलंबित आहे.मात्र आजतागायत ही मागणी पूर्ण झालेली नाही.साकव नसल्याने या नाल्यावर विजेचे खांब टाकून तात्पुरता पदपथ तयार केला आहे.गावातील सुमारे २०-२२ मुले रोज जवळच्या हायस्कूलमध्ये याच नाल्यावर असलेल्या वीज खांबावरून ये- जा करीत आहेत.त्यामुळे मुलांचा पाय घसरून नाल्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.गावातील लोकसुद्धा याच वीज खांबाचा वापर करतात.
पावसाळ्यात नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते.त्यामुळे पावसाळ्यात खांबावरून ये-जा करणे अधिक धोकादायक बनते..त्यामुळे स्थानिकांनी वारंवार नाल्यावर लहान साकव उभारण्याची मागणी केली आहे.मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष केले आहे. पाचमे गावात सुमारे ३५-४० घरे आहे.गावात जाण्यासाठी लोकांना जंगल भागातून रस्ता आहे.पण नाल्यावरून गेल्यास हायस्कूलमध्ये लवकर पोहचता येत असल्याने गावातील मुले हाच मार्ग पत्करतात.त्याशिवाय गावातील लोक सुद्धा याच नाल्यावरून ये-जा करीत असतात.त्यामुळे त्या नाल्यावर साकाव उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे