नासाच्या सूर्ययानाचा वेग ताशी ६ लाख किमीहून जास्त

  • आतापर्यंतचे सर्वात वेगवान यान

वॉशिंग्टन

नासाच्या पार्कर सोलर प्रोब मोहिमेने नवा इतिहास रचला. हे सूर्ययान आतापर्यंतचे सर्वात वेगवान यान ठरले आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी रवाना करण्यात आलेल्या या यानाने मागील महिन्यात प्रति तास ६ लाख ६४ हजार ८४ किमी इतका विक्रमी वेग नोंदवला. हा वेग जगातील सर्वात वेगवान विमानापेक्षा १८० पटीने अधिक व रायफल बुलेटपेक्षा २०० पटीने अधिक आहे.

जीन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स प्रयोगशाळेतील संशोधक मायकल बकले यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली. त्यानुसार, २७ सप्टेंबर रोजी यानाने १७ व्या सन स्विंगदरम्यान हा वेग गाठला होता. या प्रोबच्या माध्यमातून पुढील आठवड्यापर्यंत याच्याशी संबंधित डेटा मिळत राहील. यामध्ये सौर हवेचे गुण, संरचना व व्यवहार याची नोंद घेतली जाणार आहे. या यानाची सर्व यंत्रणा उत्तमरित्या कार्यरत आहे. हे यान २०१८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते.
पार्कर सोलर प्रोबला आतापर्यंतचा सर्वाधिक वेग शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळाला आहे. शुक्र सूर्यापासून १० कोटी ८२ लाख ८ हजार ९२७ किलोमीटर अंतरावर आहे. यानाने २१ ऑगस्ट रोजी २ फ्लायबाय-६ पूर्ण केले आहे. म्हणजेच,यानाने एकाच महिन्यात तब्बल १० कोटी किलोमीटरचा प्रवास केला आहे.

नासाचे १२ ते १३ संशोधक, अभियंते आणि सहायक कर्मचार्‍यांचे पथक या यानावर लक्ष ठेवून आहेत. जवळपास १.५ अब्ज डॉलर खर्चाचे पार्कर सोलर प्रोब एप्रिल २०२२ मध्ये सूर्याच्या वायुमंडळाजवळून गेला होता. त्यावेळी या यानाने १३०० डिग्री सेल्सियस तापमान व पृथ्वीच्या तुलनेत ५०० पटीने अधिक रेडिएशनचा सामना केला होता. प्रोब आपल्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात यापूर्वीच्या अन्य कोणत्याही यानाच्या तुलनेत ७ पटीने अधिक सूर्याजवळ पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top