नितीशकुमारांनी बाजी मारली! लालूंचे आमदार फोडून बहुमत जिंकले

पाटणा – बिहारमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या अत्यंत वेगवान नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदच्या लालु-तेजस्वी यादवना जोरदार दणका देत विधानसभेत बहुमत सिध्द केले. फोडाफोडीच्या राजकारणात राजदचे तीन आमदार फोडून नितीशकुमार यांनी लालुप्रसाद आणि तेजस्वी यादव यांच्यावर मात केली. नितीशकुमार यांच्या जदयूचा एक तर भाजपाचे तीन आमदार सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे नितीशकुमार यांना खरेतर 122 चे काठावरचे बहुमत मिळाले असते. मात्र रविवारी मध्यरात्री जबरदस्त खेळी करीत नितीशकुमार यांनी राजदचे तीन आमदार फोडले. त्यामुळे नितीशकुमार यांना अधिकची तीन मते मिळाली. त्यांनी बहुमताचा ठराव 129 विरुध्द 112 मतांनी जिंकला.
बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. बहुमतासाठी 122 चा आकडा आवश्यक आहे. तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये राजद-79, काँग्रेस -19, डावे पक्ष- 16 आणि एआयएमआयएम- 1 असे एकूण 115 आमदार होते. तर सत्ताधारी एनडीए आघाडीकडे जदयू-45, भाजपा-78, हम-4 आणि अपक्ष-1 असे एकूण 128 आमदार होते.
नितीशकुमार बहुमत सिध्द करू शकणार नाहीत, असे राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सुरुवातीपासून छातीठोकपणे सांगत होते. त्यामुळे ते सत्ताधारी आघाडीतील काही आमदार फोडून नितीशकुमार यांना धक्का देतील असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात सारा खेळ नितीशकुमार यांनी त्यांच्यावरच उलटविला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाने सर्वप्रथम लालूप्रसाद यांच्या पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. चौधरी यांना विधानसभेच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्या जागी विधानसभेचे उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांच्या हाती सूत्रे देण्यात आली. त्यानंतर बहुमत चाचणी झाली.
गेले दोन-तीन दिवस दुसर्‍याचे आमदार फोडायचे आणि आपले आमदार फुटणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी घ्यायची, अशी दुहेरी कसरत सारेच पक्ष करीत होते. त्याचाच एक भाग म्हणून तेजस्वी यादव यांनी आपल्या सर्व आमदारांची आपल्या बंगल्यावर शनिवारी रात्री बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व आमदारांना तेजस्वी यांच्याच बंगल्यावर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. आमदारांचे कपडे आणि जरूरी सामान त्यांच्या घरून मागवून घेण्यात आले होते. एक प्रकारे राजदचे हे आमदार तेजस्वी यांच्या बंगल्यावर नजरकैदेत होते. मात्र रविवारी मध्यरात्री अशी काही चक्रे फिरली की, मध्यरात्री तेजस्वी यांच्या बंगल्यावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. मध्यरात्री बिहारचे पोलीस राजदचे एक आमदार चेतन आनंद यांना शोधण्यासाठी तेजस्वी यांच्या बंगल्यावर आले. कारण चेतन यांचे बंधु अंशुमन आनंद यांनी चेतन दोन दिवसांपासून गायब असल्याची तक्रार पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तेजस्वी यांच्या बंगल्याला वेढा देऊन दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी बंगल्यात शिरले. काहीवेळाने पोलीस बंगल्यातून बाहेर निघाले. त्यानंतर बंगल्यातून राजदचे तीन आमदार आपापल्या गाड्यांमधून बंगल्यातून निघून गेले होते. चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव हे ते आमदार होते. सोमवारी ज्यावेळी विधानसभेत बहुमत ठरावावर मतदान होणार होते तेव्हा राजदचे हे तीन आमदार विधान भवनाकडे बराच वेळ फिरकले नव्हते. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरानंतर हे तीन आमदार विधानसभेत आले खरे, पण ते विरोधी बाकांवर म्हणजे राजदच्या बाजूला न बसता सरळ सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. ठरावावर त्यांनी नितीशकुमार यांच्या बाजूने मतदान केले. व्हीप जारी केला नसल्याने त्यांच्यावर कारवाईही होऊ शकत नाही.
दुसरीकडे जदयू-भाजपा आघाडीतील पाच आमदार सुरुवातीला बेपत्ता होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात होता. क्षणोक्षणी उत्कंठा वाढत चालली होती. या पाच आमदारांमध्ये मिश्रीलाल यादव, भागीरथी देवी आणि रश्मी वर्मा हे भाजपाचे तीन आणि डॉ. संजीव आणि बिमा भारती हे जदयूचे दोन आमदार होते. बहुमत ठरावावर मतदान होण्याच्या अगदी थोडा वेळ आधी डॉ. संजीव विधानसभेत आले. मात्र बिमा भारती शेवटपर्यंत आल्या नाहीत. मतदान झाले तेव्हा भाजपाचे तीन आणि जदयूचा एक अशा चार आमदारांनी नितीशकुमार यांना दगा दिल्याचे स्पष्ट झाले. अर्थात ती कमतरता नितीशकुमार यांनी राजदचे तीन आमदार फोडून भरून काढली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top