पत्नीने विष पाजलेल्या कोल्हापुरच्या लष्करी जवानाचा उपचारा दरम्यान मृत्यू

कोल्हापूर – पंधरा दिवसांपूर्वी पत्नीने प्रियकराच्या मदतीने हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजलेल्या कोल्हापूरच्या लष्करी जवानाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अमर भीमगोंडा देसाई (३९) असे या जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. अमर देसाई यांच्यावर पुणे येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. १७ दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर शनिवारी त्यांची ही झुंज संपली . आज सकाळी नऊ वाजता गडहिंग्लज तालुक्यात कसबा नूल या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.जम्मू आणि काश्मीर येथे तैनात असलेले अमर देसाई हे सुट्टी घेऊन गावी आले होते.१८ जुलै रोजी रात्री ते पाटणे सिमेंट पाईप कारखान्याजवळील आपल्या बंगल्यात झोपले होते.त्यावेळी पत्नी तेजस्विनी आणि तिचा प्रियकर सचिन परशुराम राऊत यांनी त्यांच्यावर जबरदस्तीने विषप्रयोग केला.या प्रकरणी पत्नी तेजस्विनी आणि प्रियकर सचिन राऊत यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्विनी हिने गुन्ह्याची कबुली दिली असून सचिन याने दुसऱ्या दिवशी १९ जुलै रोजी स्वतः विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याच्यावर बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तर जवानाची पत्नी तेजस्विनी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.