देवगड – मागील काही दिवसांपासून देवगड परिसरात अधूनमधून परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील उभे भाताचे पीक जमीनदोस्त होत आहे. त्यातच रानडुकरे आणि गवा रेड्यांचा उपद्रव वाढत चालला आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
सध्या भातपीक कापणीला आले आहे. मात्र सतत पडणार्या परतीच्या पावसामुळे या कापणीला विलंब होत आहे. इतकेच नाही तर काही ठिकाणी जोरदार पावसामुळे उभी भातशेती जमीनदोस्त झाली आहे. आडव्या पडलेल्या भातशेतीला कोंब फुटत आहेत. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यातच रानडुकरे आणि गवारेडा आदी वन्यप्राणीही भात शेती फस्त करीत आहेत. तरी शासनाकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीची आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी,अशी मागणी देवगडातील शेतकरी करीत आहेत.