पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त हजारोभाविकांनी औंढा नागनाथाचे दर्शन घेतले

औंढा नागनाथ – आज पहिल्या श्रावणी सोमवारी हिंगोली जिल्ह्यासह विविध राज्यांमधील भाविकांची आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औढा नागनाथ येथे अलोट गर्दी उसळली. पहाटे २ वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते.श्रावणी सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास देवस्थानचे विश्वस्त अॅड शिवशंकर वाबळे उमरेकर आणि व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी गर्भगृहात श्री नागनाथ प्रभुंना दुग्धाभिषेक घालून महापूजा केली. महापूजेनंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. नागनाथाचे दर्शन सर्व भाविकांना सुरळीतपणे घेता यावे यासाठी मंदिर संस्थान आणि पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.धर्मदर्शन आणि पासधारक अशा दोन स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या.वैद्यनाथ मंदिरासमोरील पंचमुखी महादेव मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती.भाविकांसाठी काही सामाजिक संघटनांकडून साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू आणि पाण्याचे पाऊच वाटण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत औंढा नागनाथ मंदिरात सुमारे ९० हजार भाविकांनी दर्शन घेतले,असे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.