८ जणांचा मृत्यू, २६ जखमी
श्रीनगर
पाकव्यप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशातील चिलास येथे काल सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात बसमधील ८ जणांचा मृत्यू झाला असून २६ प्रवासी जखमी आहेत. मृतांमध्ये २ लष्करी सैनिकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. या हल्ल्यात स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा एक कर्मचारीही जखमी झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे. ही बस गिलगिटहून रावळपिंडीच्या दिशेने जात होती.’ चिलासचे पोलीस उपायुक्त आरिफ अहमद यांनी सांगितले की, ‘या हल्ल्यात ठार झालेल्या ८ जणांपैकी ५ जणांची ओळख पटली आहे. या बसमधील अनेक प्रवासी कोहिस्तान, पेशावर, घिझर, चिलास, राऊंडू, स्कर्दू, मानसेहरा आणि स्वाबी या प्रदेशांमधून होते. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.’ चिलासचे पोलीस या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री हाजी गुलबर खान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. मुख्यमंत्री गुलबार खान यांनी सांगितले की, ‘या घटनेच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी सुरु असून, दहशतवाद्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल.’