पालघरच्या आदिवासी मुलीला संयुक्त राष्ट्रांच्या फोरमचे निमंत्रण

पालघर- पालघरमधील एका आदिवासी मुलीने आपल्या समाजाची मान गौरवाने उंचावली आहे. जे.जे. रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिक्षण घेत असलेल्या तन्वी वरथा नावाच्या या मुलीला इटलीतील संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या इंडिजिनस पीपल्स युनिटने आयोजित केलेल्या यूएन ग्लोबल इंडिजिनस यूथ फोरम अर्थात जागतिक स्वदेशी युवा मंचामध्ये आमंत्रित केले आहे.

पालघर तालुक्यातील माहीममधील रांजनपाडा या आदिवासी वस्तीतील तन्वी वरथा ही मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तरीही तिचे आपल्या आदिवासी संस्कृतीच्या मातीशी असलेले घट्ट नाते ती विसरलेली नाही. ती इटलीतील रोम शहरात होणार्‍या जागतिक स्वदेशी युवा मंचाच्या व्यासपीठावर आपल्या आदिवासी शेतकरी बांधवांचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती आपल्या राज्यातील आदिवासी शेतकर्‍यांच्या लागवडीच्या पध्दती आणि शेतीचे तंत्र जगासमोर मांडणार आहे.

देशातील काही मोजक्या युवक युवतींना या मंचाने निमंत्रण दिले आहे. देशी वारली संस्कृती आणि तिचे जतन करण्याची गरज याबद्दल ती त्याठिकाणी बोलणार आहे. पालघरमधील शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकलेल्या तन्वीने ‘ नीट प्रवेश ‘ परीक्षेत ५५० गुण मिळवले आहेत. ती एक वारली कला चित्रकार आहे.तिने तिच्या आईसोबत आदिवासी महिलांच्या उत्थान आणि सक्षमीकरणासाठी प्रकल्पामध्ये भाग घेतला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top