-परिसरात भीतीचे वातावरण
पुणे
पुण्याच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून काल एक बिबट्या पसार झाला. विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यातील बिबट्या पसार झाल्याचे सांगितले जात आहे. वनविभागातील अधिकारी या बिबट्याचा शोध घेत आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत जाऊ नये यासाठी वन विभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.
बिबट्या पसार झाल्याची माहिती मिळताच प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले. या कालावधीत प्राणी संग्रहालयात नागरिकांना जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तीन मादी व एक नर बिबट्या आहेत. पसार झालेला बिबट्या कर्नाटकमधील हंपीहून आणलेला होता. प्राणी संग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचे नाव “सचिन” आहे. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काल हा बिबट्या पसार झाला. पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या वाकवून तो पसार झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. बिबट्या पसार झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रॉनचे वापर देखील करण्यात येणार आहे. बिबट्याला शोधण्यासाठी २०० जण तैनात करण्यात आले आहेत. अजूनही बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कात्रज प्राणी संग्रहालयातील एक सीटीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसत आहे. मात्र अजून हा बिबट्या सापडला नाही. त्याचा शोध सुरू आहे.