पुणे- पुण्यातील ओला आणि उबरची सेवा येत्या २० फेब्रुवारीपासू बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले दर ल लागू करण्यासाठी कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा आरोप चालकांनी केला आहे. त्यामुळे चालकांनी संतप्त होऊन २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुणे आणि चिंचवडमधील ओला आणि उबर चालक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. चालकांच्या या आंदोलनामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी नवे दरपत्रक जाहीर केले आहे. हे नवीन दर १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अद्याप कंपन्यांनी या नवीन दरांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे चालकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल तसेच वाढीव दराचा चालकांच्या व्यवसायावर देखील परिणाम होणार आहे. यामुळेच कंपन्यांनी अद्याप नवीन दरांची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप कॅब चालकांनी केला आहे. त्यामुळे कॅब चालक येत्या २० फेब्रुवारीपासून पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. सकाळी ११ वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येऊन निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात जवळपास २० हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.