पुन्हा मंत्रिमंडळ बैठक! 19 निर्णयांचा पाऊस! मुंबईत टोल बंद! धारावीला देवनारचीही जमीन

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या लागणार असल्याची चर्चा असताना आज सकाळी 9.30 वाजताच राज्य सरकारची आज आणखी एक मंत्रिमडळ बैठक घेऊन त्यात 19 निर्णय घेण्यात आले. यात मुंबईत प्रवेश करताना असलेल्या पाच टोलनाक्यांवर पूर्ण टोलमाफी जाहीर झाली. त्याचबरोबर धारावी प्रकल्पासाठी आणखी एक मोठी जमीन देण्याचा निर्णय झाला.
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या लागणार असल्याची चर्चा असताना आज सकाळी 9.30 वाजताच राज्य सरकारची आज आणखी एक मंत्रिमडळ बैठक घेऊन त्यात 19 निर्णय घेण्यात आले. यात मुंबईत प्रवेश करताना असलेल्या पाच टोलनाक्यांवर पूर्ण टोलमाफी जाहीर झाली. त्याचबरोबर धारावी प्रकल्पासाठी आणखी एक मोठी जमीन देण्याचा निर्णय झाला.
आम्हाला समाधान आहे. या निर्णयानंतर मनसेनेही फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला. टोलमाफी व्हावी या मागणीसाठी मनसेने अनेकदा आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्याकडे टोल रद्द करण्यासह अनेक मागण्या केल्या होत्या. त्यानंतर मनसेचे हे आंदोलन थंड पडले होते. आज मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीचा निर्णय घेतल्यावर मनसेनेही त्याचे श्रेय घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला.आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली, यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो त्यांना टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. किमान मुंबईकर टोलमुक्त झाला. आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आले ही आनंदाची बाब आहे. पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. यावर भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, टोलमाफीचा चांगला निर्णय आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी डिझेल, पेट्रोलवर जास्त कर लावला होता. महायुतीच्या सरकारने त्यातून सुटका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हा निवडणूक जुमला आहे. गांभीर्याने घेऊ नका. मुंबईतील धारावी विकास प्रकल्प अदानींकडे दिल्यापासूनच विरोधक सरकारवर टीका करत आहेत. विशेष करून उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. या प्रकरणी मविआने धारावीत मोठे आंदोलनही केले होते. नुकत्याच झालेल्या दसर्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी, आमचे सरकार सत्तेवर आल्यास अदानीचे धारावीचे टेंडर रद्द करू असा इशारा दिला होता. शिवसेना उबाठा गटाचे आ. आदित्य ठाकरेही सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, अदानीला हवी तेवढी जमीन देईपर्यंत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार नाही. या टीकेची पर्वा न करता आज सरकारने धारावी प्रकल्पासाठी आणखी नवी जमीन दिली. या निर्णयावरून ठाकरे गटाचे नेते आ. अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महायुती सरकारने मुंबई विकायला काढली आहे. अदानी यांच्या घशात मुंबई घालण्याचा सरकारचा डाव आहे. धारावीसाठी इतर राखीव प्रकल्पांच्या जागा देत आहेत. मुंबईचे वाटोळे करत असलेल्या सरकारला कोणतीही भीती नाही. अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आतापर्यंत मुलुंड येथे 58.5 एकर, कांजूरमार्गला 120.5 एकर, भांडूपला 76.5 एकर अशी मिठागराची 255 एकर जमीन आधीच देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोरिवलीजवळील मौजे आक्से आणि मौजे मालवणी येथील 140 एकर शासकीय जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांसाठी या जमिनींवर भाडेतत्वावर सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्याला विरोध होत आहे.