मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच मुंबईच्या प्रसिद्ध लालबाग राजा गणेशाचे मंडपात जाऊन दर्शन घेतले! लालबाग राजाचा आशीर्वाद घ्यायला असंख्य ख्यातनाम व्यक्ती येतात, पण पूजा अर्चा होते तिथे मी सहसा जात नाही असे म्हणणारे शरद पवार लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आणि राजकीय टोमणेबाजी सुरू झाली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित प्रतिक्रिया देत शरद पवारांचे फोटो ट्विट करीत म्हटले की, महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले. याला राजकीय पोळी भाजणे असे म्हणतात. भाजपाचे इतरही नेते याच सुरात दिवसभर वक्तव्य करीत राहिले.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबाग राजाच्या दर्शनाला येणार होते. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होती. मात्र अमित शहा येण्यापूर्वी सकाळी 11 वाजता शरद पवार मंडपात हजर झाले. त्याच्यासोबत जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे हे दोघे होते. शरद पवारांनी केवळ लालबाग राजाचेच दर्शन घेतले असे नाही तर त्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. याआधी शरद पवार मुख्यमंत्री असताना लालबाग राजाच्या दर्शनाला आले होते. कोरोना काळात त्यांनी या मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली होती. मात्र मधील काळात त्यांनी अशी दर्शनवारी कधीच केली नव्हती.
2022 सालच्या मे महिन्यात शरद पवार हे पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणेशाचे दर्शन घ्यायला येणार असे वृत्त पसरले. मात्र ते गणरायाचे दर्शन न घेता शेजारील जमिनीची पाहणी करून गेले. यामुळे काहूर माजल्यानंतर आपण मांसाहार केल्याने दर्शनाला गेलो नाही, असा अजब खुलासा करावा लागला. 2024 साली शरद पवारांनी शिर्डीला साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शरद पवार हे नास्तिक आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर शरद पवारांचा बारामतीच्या हनुमान मंदिरातील फोटो राष्ट्रवादीने जारी केले.
शरद पवार एकदा म्हणाले होते की, पूजा अर्चा जेथे होते त्या ठिकाणी मी सहसा जात नाही. देव-धर्म, पूज-अर्चना यापासून मी जरा बाजूलाच असतो. तेव्हापासून त्यांच्यावर या विषयाबाबतीत टीका होत असते. या टिकेला उत्तर देण्यासाठी 2024 साली त्यांनी शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले होते. शेवटी शरद पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही हेच खरे आहे.
आज सकाळी 9.30 वाजता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आले त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास पै यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत व कोषाध्यक्ष विकास सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.