एकाचा मृत्यू! ६ जवान जखमी
पाटणा
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विश्वास यात्रेला काल रात्री या यात्रेदरम्यान पूर्णिया जिल्ह्यात अपघात झाला. तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला सुरक्षा देत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाला असून बीएमपीचे ६ जवान जखमी झाले. मोहम्मद हलीम (५०) असे मृत चालकाचे नाव आहे. काल रात्री उशिरा रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ३ जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तेजस्वी यादव यांचा ताफा पूर्णियाहून कटिहारला जात होता. यावेळी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला कटिहारकडून पूर्णियाच्या दिशेने येणाऱ्या वाहनाने धडक दिली. मोफसिल पोलिस स्टेशन हद्दीतील पूर्णिया-कटिहार मुख्य रस्त्यावर बेलौरी अप्सरा मंगल भवनाजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला . तेजस्वी यादव यांनीदेखील रुग्णालयात जाऊन जवानांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.