पेटीएमचे आपल्या पेमेंट्स बँकेसोबतचे करार संपुष्टात

नवी दिल्ली –

पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडसोबतचे (पीपीबीएल) अनेक करार संपुष्टात आणण्यासाठी परस्पर सहमती दर्शवली आहे. पेटीएमने पीपीबीएल विरोधातील नियामक कारवाई दरम्यान परस्परावलंबन कमी करण्यासाठी संस्थांसोबतचे विविध आंतर-कंपनी करार बंद करण्याचे मान्य केले आहे.

देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने पेमेंट बँकेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पेटीएम इतर बँकासोबत भागीदारी करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बोर्डाने १ मार्च रोजी पीपीबीएलसोबतचे करार आणि शेअरहोल्डर्स करार संपुष्टात आणण्याची मान्यता दिली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक आत पेटीएमपासून स्वतंत्र संस्था म्हणून काम करणार आहेत. पीपीबीएलच्या शेअरहोल्डर्सनी कंपनीच्या कामकाजाला पाठिंबा देत शेअरहोल्डर्सचा करार सुलभ करण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी २६ फेब्रुवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. ते बँकेचे अर्धवेळ गैर-कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचे नवे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले. पेटीएम पेमेंट्स बँक लवकरच नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेत ठेवी आणि इतर व्यवहारांची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घालण्यात आली असून केवळ ट्रान्सफर आणि पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. १५ मार्चनंतर वॉलेट, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड्सदेखील टॉप अप तसेच खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top