नवी दिल्ली- रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे संकटात सापडलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे सहसंस्थापक व अकार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर बॅंकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचनाही करण्यात आली आहे.आता हे नवीन संचालक मंडळ बँकेचा पुढील व्यावसाय चालवणार आहे.
वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड ही पेटीएम पेमेंट्स बँकेची मूळ कंपनी असून तिने कंपनीच्या संचालक मंडळातून आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय शेखर शर्मा यांनीदेखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर या बँकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. या नवीन संचालक मंडळात फेरबदल करून त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त आयएसएस रजनी सेखरी सिब्बल यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान,रिझर्व्ह बँकऑफ इंडियाने १५ मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी व कर्ज देण्यास बंदी घातली आहे. या बँकेने आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी केली नसल्याने रिझर्व्ह बॅंकेने ही कारवाई केली.