प्रकाश आंबेडकरांना नाना पटोलेंची धमकी कुणाचा कुणाशी संबंध ते दोन दिवसांत सांगू

मुंबई – महायुतीत आणि मविआत जागावाटपावरून अजूनही घमासान सुरू आहे. त्यातच जरांगे- पाटील यांच्या पाठिंब्यावर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास सज्ज झालेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर काँग्रेस संतापली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीरपणे प्रकाश आंबेडकरांना धमकी देत म्हटले की, कुणाचा कुणाशी संबंध आहे ते दोन दिवसांत जाहीर करू.
मविआमधून बाहेर पडताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. विशेष करून नाना पटोले यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मी नाना पटोले यांना विचारतो आहे की, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्याबरोबर फिक्सिंग झाले आहे की नाही? असेच फिक्सिंग अनेक जागांवर होणार असेल तर काय उपयोग आहे? आम्हाला भाजपाला पराभूत करायचे आहे. त्यासाठी आम्ही योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेऊ.
प्रकाश आंबेडकर हे सतत नाना पटोले आणि काँग्रेसवर हल्ला करू लागल्याने संतप्त झालेले नाना पटोले आज म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून माझा छळ केला जात आहे. माझ्यावर व्यक्‍तिगत टीका होत आहे. मी पण वंचितच आहे. शेतकर्‍याचा मुलगा आहे. मविआ एकत्र असल्याने सर्वांनीच सर्वांसाठी काम करायचे आहे. मी आता काही बोलत नाही. पण दोन दिवसांनी सर्व सांगेन. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मात्र संयमी भूमिका घेत म्हणाले की, आमच्या सात जागांवर वंचित आम्हाला पाठिंबा देणार असेल तर अकोल्याबाबत आपण फेरविचार करू, असा प्रस्ताव आम्ही काँग्रेस हायकमांडला पाठविला आहे. या सर्व घडामोडींवर वक्तव्य करण्याचे टाळत उबाठा गटाचे संजय राऊत म्हणाले की, वंचित हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. मी त्यावर बोलू शकत नाही, पण काँग्रेसची इच्छा असेल तर मविआ बैठकीत त्यावर चर्चा होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top