प्रथमच खासदार झालेले पुण्याचे मुरलीधर मोहोळांना केंद्रात मंत्रिपद

पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना पराभूत करुन प्रथमच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपदापर्यंत अशी त्यांनी थेट झेप घेतल्याने त्यांचे आता कौतुक होत आहे.
९ नोव्हेंबर १९७४ रोजी मोहोळ यांचा जन्म मुळशी येथे झाला. पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. त्यांनी १९९९ मध्ये कोल्हापूर विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. कोल्हापुरात कुस्तीची तालीम करणारे मोहोळ १९९६ ला पुण्याच्या राजकीय आखाड्यात उतरले. भाजप पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यात मोहोळ यांनी पुणे महापालिकेतून चार वेळा नगरसेवकपद( (2002, 2007, 2012 आणि 2017), स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद (2019- 2022 )सांभाळले आहे. ते पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (पीएससीडीसीएल) संचालक , पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे संचालक, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (2017-2018) सभासद राहिले आहे. आता त्यांना केंद्रीत मंत्रीपद मिळाल्याने पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top