फडणवीसांवर हल्ला करताच जरांगेंच्या चौकशीचा निर्णय

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलन नेते जरांगे पाटील यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आज जरांगे पाटील यांची चौकशीच लावण्यात आली. भाजपा आमदारांनी मागणी केली की, जरांगेंना कोण मदत करतो ते शोधलेच पाहिजे. त्यासाठी एसआयटी नेमा. ही मागणी होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एसआयटी नेमण्याची घोषणा केली. यामुळे आता जरांगे-पाटील पूर्ण अडकले आहेत.
विधानसभेच्या अधिवेशनात आज मनोज जरांगेंवरून मोठा गदारोळ उडाला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज अधिवेशनात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत आक्रमक भूमिका मांडली. शेलार म्हणाले की, काल मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उच्च न्यायालयानेदेखील टिप्पणी केली आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याचे वक्तव्य जरांगे -पाटील यांनी केले. यावरून हे स्पष्ट होते की, कोणता तरी कट रचला जात आहे किंवा लवकरच हा कट रचला जाणार आहे. या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. कोणी महाराष्ट्र

बेचिराख करण्याची भाषा करत असतील तर आपले विरोधी पक्षनेतेदेखील त्यांच्या बाजूने बोलणार नाहीत. महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना ठरली होती का, ही केवळ धमकी होती का, या मागच्या भूमिका काय आहेत? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी केली. ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, तुम्हाला शेवटची संधी देतो. मुख्यमंत्री आणि भुजबळ यांना धमकी देण्याची हिंमत यांच्यामध्ये आली कुठून? देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी विरोधी नेत्यांनी भाजपाला संपविण्याची भाषा केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी जरांगेंनी फडणवीसांना निपटून टाकण्याची भाषा केली. यांच्यामध्ये काय संबंध आहे. यामागे काय कटकारस्थान आहे याचा शोध घेतला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांचा सभा उधळून टाकू, अशी भाषा जरांगेंनी केली. याची गंभीर नोंद घेतली पाहिजे. हे सगळे करणारे मनोज जरांगे-पाटील हे राहतात कुठे हे शोधले पाहिजे. तो साखर कारखाना कोणाचा आहे? त्या ठिकाणी आलेले दगड कोणाच्या कारखान्यातून आले? या आंदोलात जेसीबी आणि ट्रॅक्टर कोणाच्या माध्यमातून आले? ते सदस्य कोणत्या पक्षाचे आहेत? या सगळ्यामागे जर भूमिका एका व्यक्तीची, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, कारखान्याच्या मालकाची असेल तर त्याच्या चौकशीसाठी एसआयटी लावावी अशी मी
मागणी करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top